नागपूर – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या भोवती असणाऱ्या माणसांकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र व पिस्तुले असल्याचा दावा केला आहे. मनोज जरांगे व त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांची चौकशी करा. ते काळे धंदे करणारे लोक आहेत. त्यांच्याकडे पिस्तुलासारखी वेगवेगळी शस्त्रे सापडतील, असे भुजबळ म्हणाले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ओबीसी नेते भुजबळ यांच्यावर एकेरी शब्दांत टीका केली. छगन भुजबळ एकदा तुरुंगात जावून आलेत. त्यांना पुन्हा त्यात जायचे नाही, त्यामुळे त्यामुळे ते माझ्या जिवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटेनाटे सांगून वेळ मारू नेत आहेत, असे ते म्हणाले. बीडमधील हिंसाचारामागे भुजबळ असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला भुजबळ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, सरकारकडून कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे या लोकांचा ओबीसी आरक्षणात समावेश होईल. जरांगेचे आरोप हे अत्यंत बालिश आरोप आहेत. मी बीडमध्ये जावून एवढी मोठी दंगल करू शकतो का?
मुळात असे करण्याचे कारणच काय? या दंगलीप्रकरणी पकडण्यात आलेली पिस्तुलधारी माणसे मनोज जरांगे यांची आहेत. बीडमधील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी पकडलेली माणसे जरांगे यांच्याबरोबर २४ तास राहणारी होती, असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
कुणाला साधा दगड मारला नाही
बीडच्या घटनेशी माझा संबंध काय? गेली कित्येक वर्षे मी बीडला गेलो नाही. तिथे जाऊन मी माझ्याच लोकांची घरे जाळणार काय? मी एवढा अमानुष नाही. ज्या पद्धतीने त्यांनी हे सर्व केले, तेवढा मी अमानुष नाही. मी मागील ५७ वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहे.
मी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली. प्रसंगी जीवही धोक्यात टाकला. पण मी कुणालाही साधा दगड मारला नाही. असा कोणताही अहवाल माझ्याविरोधात नाही, असेही भुजबळ पुढे म्हणाले.