महाळुंगे इंगळे – देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणास रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट तीनच्या सहकार्याने सापळा रचून मंगळवारी (दि. 7) रात्री जेरबंद केले. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भांबोली (ता. खेड) गावच्या हद्दीत पकडण्यात आलेल्या संबंधित तरुणाकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गणेश श्रीमंत चव्हाण (वय 23, रा. देहूगाव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण एमआयडीसीमधील भांबोली (ता. खेड) गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 7) रात्रीच्या वेळी चाकण पोलीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गणेश चव्हाण हा भांबोली गावच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विक्रीसाठी येणार आहे.
त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी भांबोली फाटा ते शिंदे (ता. खेड) गावच्या हद्दीतील रस्त्यावर सापळा लावला. नेमका त्याच वेळेस गणेश हा नियोजित ठिकाणी आला असता त्याला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे सापडली.