पिरंगुट – येथील एका रेशन विक्रीच्या दुकानातून दोन नागरिकांना अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला होता; मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांच्या मदतीने तात्काळ या नागरिकांना गहू बदलून मिळाला.
पिरंगुट येथील मध्यवस्तीत रेशनिंग विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. 10) एक रेशनिंग कार्ड धारक महिला आणि पुरुष मासिक धान्य घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला. या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणावर खडे, माती मिसळली होती. हा गहू खाण्यालायक नव्हता. रेशनिंग कार्ड धारकांनी ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. विक्रेत्यांनी तात्काळ हा गहू दोन्ही धारकांना बदलून दिला.
रेशनिंग विक्रेते म्हणाले, शासनाकडून प्राप्त झालेल्या धान्यातील पाच ते सात गोण्यांमधून हा खराब गहू आलेला आहे. ही बाब लक्षात आल्याने ग्राहकाला हा गहू बदलून दिला आहे. खराब झालेला गहू परत पाठविला आहे.
पुरवठा अधिकारी अश्विनी गायकवाड म्हणाल्या, खराब आलेले धान्य ग्राहकांना न देता ते तसेच बाजूला ठेवले पाहिजे. उर्वरित कोट्यातून चांगल्या दर्जाचे धान्य ग्राहकाला दिले पाहिजे, अशा सूचना सर्व दुकानधारकांना दिलेल्या आहेत.