पिंपरी – करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शुक्रवारी (दि. 10) शहरातील विविध भागांमध्ये मास्क न वापरणारे नागरिक आणि थुंकीबहाद्दरांविरूद्ध महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एका दिवसात तब्बल 5 लाख 17 हजार 600 रुपयांची दंड रक्कम नागरिकांकडून वसुल करण्यात आली. दंड घेऊ नये, यासाठी काही नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र, तरीही दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सुचनेनुसार ही मोहीम घेण्यात आली. महापालिका आयुक्तांनी आदेश काढल्यापासून आर्जपर्यंत मास्क न वापरणाऱ्या 641 नागरिकांकडून 3 लाख 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रत्येकाकडून 500 रुपये याप्रमाणे दंड वसूल केला. “ग’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक 149 जणांकडून 7 लाख 45 हजार रुपयांचा दंड घेण्यात आला.
तर, “फ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वात कमी 40 नागरिकांकडून 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. रस्त्यावर थुंकणाऱ्या 1 हजार 314 नागरिकांकडून प्रत्येकी 150 रुपयाप्रमाणे एकूण 1 लाख 97 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. “फ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक 241 नागरिकांकडून 36 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केला. तर, “ब’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वात कमी 68 नागरिकांकडून 10 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला.