नगर – नगरमध्ये कालपासून थंडीत वाढ झाली असून आज नगरचे तापमान 12.03 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा सहारा घ्यावा लागत आहे. दरम्यान, नगर शहरासह उपनगर व परिसर आज सकाळी गर्द धुक्यात हरवला होता. या धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले होते… मात्र, गेल्या आठवड्यात गुलाबी वाटणारी थंडीने बोचरे रूप धारण केले.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धुुके पडत आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा घसरत असतांना आता धुके पडण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी अधिकच दाट धुुके पडले होते. पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत धुके होते. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही उशिराने झाले. तोपर्यंत चांगलाच गारठा जाणवत होता. धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतूक देखिल मंदावली होती. अनेक वर्षांनंतर असे धुके शहरात पहावयास मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. काही अंतरावरील रस्ता दिसत नसल्याने वाहने लाईट सुरू करून आणि मंदगतीने जात होते. जणू हि वाट धुक्याची झाली होती. हाय-वे आणि शहरांतर्गत रस्त्यावरही अशीच अवस्था होती. संपूर्ण शहर जणू धुक्यात हरवले होते.
दाट धुक्यासोबत थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करतांना पहायला मिळत होते. तर बहुतांश नागरिक उबदार कपडे घालून जॉगिंग पार्क, रस्त्यांवर फिरतांना दिसत होते. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पहाटेच या धुक्याचे दर्शन झाले. काही रस्त्यांच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपऱ्यांवर बोचऱ्या थंडीत चहाचा आस्वाद घेण्यासाठी ज्येष्ठांसह अनेकांनी गर्दी केली होती. शनिवार असल्याने शाळा सकाळची होती. शाळेत जाणाऱ्या मुलांना ढगातील शाळा पहायला मिळाली. अनेकांनी या धुक्यात मोबाईलवर सेल्फी फोटो काढून आनंद लुटला.