- 2166 स्वयंसेवक करणार तपासणी : “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम
पिंपरी – “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत शहरातील 25 लाख नागरिकांचे दोन टप्प्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. करोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणारी “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी केले.
ही मोहीम 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2020 दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची आढावा बैठक मंगळवारी (दि.15) स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत शहरातील 24 लाख 76 हजार 483 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून 2166 स्वयंसेवकांच्या मदतीने हि मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन महानगरपालिकेने आखले आहे.
12 स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व 12 स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे. स्वयंसेवकांना किमान 10 वी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर तर दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान तपासणे,ताप खोकला, दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये रेफर केले जाणार आहे.
या बैठकीला उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक विलास मडीगेरी, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.