“कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकार कंगनामध्ये रंगले’

  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची उपराेधित टीका

लोणावळा – “कोविड-19’चा प्रादुर्भाव वाढत असताना आणि हे संकट आता मोठ्या शहरासोबत लहान शहरात आणि ग्रामीण भागात पोहोचले असताना त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सरकार मात्र कंगनामध्येच रंगलेले दिसत आहे. करोनामुळे लोक मरत असताना, त्यांच्या अडचणीत वाढ होत असताना राज्य सरकारची प्राथमिकता सध्या कंगना बनली आहे. हे सरकार जितके कंगनावर बोलत आहे, त्यातील चार वाक्‍य जरी कोविडवर बोलले आणि व्यवस्था केली तर राज्यातील जनतेला दिलासा मिळेल, अशी उपरोधिक टीका राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

लोणावळा शहरात आयोजित कोविड महासर्वेक्षण अभियानाच्या उद्‌घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे लोणावळा शहरात आले होते. या वेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दरेकर यांच्यासमोर शासनाकडून नगरपरिषदेस अजूनही कोणत्याही प्रकारची मदत प्राप्त झाली नसल्याबद्दल खंत व्यक्‍त केली. यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे, असे आवाहन केले.

या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.