पिंपरी : सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प लांबणीवर

  • आयुक्तांना अधिकार देण्याचा विषय तहकूब

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मैलासांडपाणी पुन:वापर व पुन:चक्रीकरण (रियूज ऍण्ड रिसायकल) हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले प्रतिदिन 120 दशलक्ष लिटर पाणी वापरासाठी औद्योगिक क्षेत्र व हाउसिंग सोसाट्यांना पुरविले जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 654 कोटी खर्च अपेक्षित आहे. तो प्रकल्प खासगी तत्वावर (पीपीपी) किंवा विविध वित्तीय पुरवठ्याद्वारे निधी उभारून (एचएएम) राबविण्याचे सर्व वित्तीय अधिकार आयुक्तांना देण्याचा विषय तहकूब करण्यता आला आहे.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. या प्रकल्पासाठी शहराच्या भौगोलिक रचनेनुसार चार भाग करण्यात आले आहेत. भाग क्रमांक 1 मध्ये पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी, चिंचवड, भाग क्रमांक दोनमध्ये चिखली एमआयडीसी, भाग क्रमांक तीनमध्ये निगडी, प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि भाग क्रमांक चारमध्ये चाकण एमआयडीसीचा समावेश आहे. हिंजवडी एमआयडीसीसोबत करार न झाल्याने तो भाग वगळून पहिल्या टप्प्यात चिखली व चऱ्होलीचा समावेश करण्यात आला आहे.

वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, चिंचवड, चिखली, चऱ्होली व एमआयडीसी क्षेत्रात कासारवाडी येथून 75, चिखलीमधून 20 आणि चऱ्होली येथून 5 असे एकूण प्रतिदिन 100 दशलक्ष लिटर इतके वापराचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 306 किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे जाळे निर्माण केले जाणार आहे.

प्रशासकीय मान्यता मिळून उलटली दोन वर्षे
पाणी वितरण व्यवस्थेसाठी वाकड, पिंपळे सौदागर, कासारवाडी एमआयडीसी, चिखली व चऱ्होली अशा 5 ठिकाणी 1 ते 5 दशदलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्‍या बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी जीएसटी धरून 654 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास सर्वसाधारण सभेने 7 डिसेंबर 2018 ला प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प पीपीपी किंवा एचएएम तत्वावर करायचा त्याचे सर्व वित्तीय अधिकार आयुक्तांना देण्यास सर्वसाधारण सभेने नकार दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.