-->

चिकन विक्रीसाठी पोल्ट्रीचालकांच्या आकर्षक ऑफर्स

पिंपरी – बर्ड फ्ल्यूमुळे अचानकपणे चिकनची विक्री घटल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे चिकनविक्री पुन्हा सुगीचे दिवस येण्यासाठी या व्यावसायिकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी चिकनची कमी दरात विक्री, चिकन खरेदीवर अंडी फ्री अशा आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. तर आमच्या पोल्ट्रीतील चिकनखाल्ल्याने बर्ड फ्ल्यू झाल्याचे दाखवा आणि 10 कोटी रुपये मिळावा, अशी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.

गेली काही दिवसांपासून काही किलोमीटर अंतरावरील मुळशी तालुक्‍यात बर्ड फ्ल्यूची बाधा झालेल्या कोंबड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ व परिसरात चिकन व अंड्यांची विक्री एकदम घटली आहे. त्याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. परिणामी मटन व मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

मालाला भाव आणि उठावदेखील मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. करोनानंतर सावरलेल्या या व्यवसायाला आता पुन्हा घरघर लागली आहे. त्यामुळे पाठ फिरविलेल्या ग्राहकांची पावले चिकनकडे पुन्हा वळविण्यासाठी पोल्ट्री व्यवसायिकांकडूनच कमी दरात चिकनची विक्री केली जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडूनही कमी दरात चिकनची विक्री होत आहे. मात्र, तरीदेखील हे पोल्ट्री व्यावसिायक ग्राहकांचा विश्‍वास जिंकू शकलेले नाहीत.

दरम्यान, बर्ड फ्ल्यूची धास्ती न बाळगता चिकन खाण्याचे आवाहन राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने केले आहे. त्याकरिता या पशूसंवर्धन आयुक्‍तालयाच्या औंध येथील कार्यालयात चिकन व अंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, असे जनजागृतीचे कार्यक्रमदेखील मांसाहारीप्रेमींचा विश्‍वास जिंकू शकले नाहीत. त्यामुळे चिकनविक्री केंद्राबाहेरील जाळ्यांमध्ये पडलेल्या कोंबड्या असे दृश्‍य सर्रासपणे पहायला मिळत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चिकनचा प्रतिकिलोचा भाव 200 रुपयांहून 140 रुपयांवर आला आहे. तर अंड्याचा प्रति नगाचा भाव सहा रुपयांहून चार रुपयांवर आला आहे. तर एक किलो चिकनवर सहा अंडी मोफत अशी जाहिरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तरीदेखील मटन, मासळीला ग्राहकांकडून मागणी असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.