- मोठी दुर्घटना टळली ः रुग्णालयांची गरज भागविण्यात यश
पिंपरी – शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने शहरात मंगळवारी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मंगळवारी (दि. 20) रात्री काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शहरातील रुग्णालयांकडे शिल्लक होता. ऑक्सिजन संपल्यास हाहाकार उडण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत दोन टॅंकी जप्त केले अन् रुग्णांची गरज भागविली. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये 255 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 442 रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत शहराला ऑक्सिजन पुरवठा झालेला नव्हता. तर काही तास पुरेल एवढाचा साठा अनेक ठिकाणी शिल्लक होता.
आमदार महेश लांडगे यांनी समाज माध्यमांद्वारे परिस्थिती भीतीदायक झाल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती गंभीर बनल्याचेच समोर आले होते. शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यास पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता.
महापालिकेच्या जम्बो कोविड, ऍटो क्लस्टर व इतर रुग्णालयांमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मेसर्स सहानी, मेसर्स आयनॉक्स व मेसर्स एअर लिक्वीड यांनी ऑक्सिजन टॅंकर देण्यास नकार दिला होता. आम्ही येणार नाही, उशिरा येणार अशी कारणे देत चालक टाळाटाळ करत होते. अखेर मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑक्सिजन समन्वयक तथा उपायुक्त स्मिता झगडे यांना ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त स्मिता झगडे, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडकेर यांनी ऑक्सिजनचे टॅंकर पकडून आणले.
तसेच यासाठी त्यांनी कंपन्यांनाही भेट दिली. मात्र, ऑक्सिजन नसल्याने पुरवठा करता येणार नाही अशी उत्तरे देण्यात आली. यानंतरही अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर रात्री तीन वाजता तीन ऑक्सिजन सिलिंडरमधून 22 टन ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यात पालिका अधिकाऱ्यांना यश आले. ऑक्सिजन मिळाल्याने शहरातील सर्व रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.