पिंपरी, दि. 6 -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यावर्षी विविध झाडांची तीन लाख रोपे लावण्यात येणार आहेत.
निगडी रेड झोनमधील मोकळ्या जागेच्या कडेने 11 किलोमीटरच्या परिघात सुमारे 1 लाख देशी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. या रोपणाची सुरुवात करण्यात आली असून 350 देशी प्रजातीच्या रोपांची लागवड केली जात आहे.
वृक्षारोपण मोहिमेत विविध शासकीय कार्यालये सहभागी होत आहेत ही चांगली बाब आहे. यापुढेही सर्वांनी अशा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी महापालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड मिलिटरी स्टेशन आणि वनप्रकल्प विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील लष्करी जागेत वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.