प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 -महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 – संयुक्त पेपर एकच्या परीक्षेवेळी पुण्यातील परीक्षा केंद्रात एक उमेदवार गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेत संबंधित उमेदवारांवर आयोगाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 परीक्षा राज्यभरातील सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाइल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या परीक्षेमध्ये अत्याधुनिक उपकरणाच्या आधारे गैरप्रकाराचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार आयोगाच्या दक्षता पथकाने अचानकपणे संबंधित संशयित उमेदवारांची तपासणी केली.