दर वाढले तरीही नागरिकांचा खरेदीकडे ओढा
पिंपरी – शहरामध्ये उष्णतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दैनंदिन तापमान सुमारे चाळीस अंशापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे गारव्यासाठी शहरातील नागरिकांकडून एसी, कूलरची मागणी वाढली आहे. घरांसह कार्यालयामधून देखील नागरिकांची यासाठी मागणी वाढत आहे. यंदा एसी, पंखे व कूलरच्या किंमतीमध्ये सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रीक साहित्याच्या दुकानामध्ये गर्दी केली आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर शहरातील उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाल्याने या कालावधीमध्ये दरवर्षी एसी, कूलर, फ्रीज यांना मागणी वाढते. यावर्षी किंमतीमध्ये वाढ झाली असूनही ग्राहकांची मागणी वाढली आहे. कूलरच्या किंतीमध्ये 1500 ते 2000 रुपयांनी वाढ झाली आहे.
बाजारामध्ये 2 ते 18 हजार रुपयापर्यंत कूलर विक्रीसाठी आहे. जो कूलर गेल्या वर्षी पाच हजार रुपयांना मिळत होता, तो यावर्षी सात हजार रुपयांना झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फ्रीज व एसीच्या मागणीमध्ये देखील वाढ झाली आहे. बाजारामध्ये फ्रीज 8 हजारांपासून उपलब्ध आहेत तर एसीच्या किंमतीमध्ये सुमारे तीन हजार रुपयांपासून वाढ झाली आहे. नामांकित कंपन्यांचे एसी 27 हजार रुपयांपासून पुढे आहेत.
उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच युक्रेन व रशिया युद्धामुळे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. नामांकित कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. तसेच वाढत्या इंधन दराचा देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपन्यांना आपल्या प्रोडक्टच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात वाढ करावी लागली आहे. परिणामी एसी, कूलर, फॅनच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असले तरी नागरिकांची मागणी चांगली आहे.
– पवन भळगट, विक्रेता.
पंख्यांच्या किमतीमध्येही मोठी वाढ
सिलिंग, टेबल तसेच वॉल फॅनला देखील ग्राहकांची मागणी वाढली आहे. एसी व कूलरच्या तुलनेत स्वस्त असल्याने सर्वसामान्यांसाठी उन्हाळ्यामध्ये फॅनला पसंती मिळते. फॅनच्या किंमतीमध्ये देखील तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. विविध आकर्षक डिझाईन व रंगांमध्ये फॅन बाजारात उपलब्ध आहेत.