पिंपरी – अनैतिक संबंधातून एका नराधमाने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेलपिंपळगाव येथील हांडे यांच्या भाड्याच्या खोलीत घडली.
विक्रम शरद कोळेकर (रा. कोयाळी, ता. खेड) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. 22) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपीचे अनैतिक संबंध होते.
त्यातून आरोपीने 6 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पाय गंभीरपणे भाजले. भाजलेल्या ठिकाणची कातडी जळून गेल्याने उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची वाच्यता कोठे केल्यास फिर्यादी आणि त्यांच्या मानलेल्या बहिणीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.