पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 11 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्याबाबतचे सॅम्पल तयार करण्यात आले असून त्यामध्ये शून्य दिवसांत एकूण 18 डेंग्यू बाधित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूबाबत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात आली आहे.
शहरात पावसामुळे डासोत्पत्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाकडून विविध आस्थापनांची तपासणी करून डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, संबंधितांना नोटिसा बजावून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.
शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून 20 जुलैपर्यंत एकूण 2 हजार 113 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जानेवारी ते जून अशा सहा महिन्यांमध्ये एकही रुग्ण डेंग्यूने बाधित आढळला नव्हता. दरम्यान, 1 ते 20 जुलै या कालावधीत 1 हजार 11 डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले. तर त्यातील 18 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जुलै महिन्यामध्ये हिवतापाचा (मलेरिया) एकही बाधित रुग्ण आढळला नाही. तथापि, जानेवारी ते जून अशा 6 महिन्यांमध्ये 9 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1 जानेवारी ते 20 जुलै या दरम्यान चिकुनगुनियाचे 7 संशयित रुग्ण आढळून आले. तथापि, त्यातील एकही रुग्ण बाधित झालेला नाही.