संगमनेर- ओळखीचा गैरफायदा घेत पठार भागातील एका नराधमाने अवघ्या साडेचौदा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस फसवून संगमनेरातील एका हॉटेलमध्ये आणून बळजोरीने तिच्यावर अत्याचार केला. शनिवारी दिवसा घडलेल्या या प्रकाराची पहाटे नोंद होताच घारगाव पोलिसांनी शेंडेवाडीतील गणेश सुखदेव भंडागे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संगमनेर शहरातील ज्या हॉटेलात अल्पवयीन मुलीला घेऊन आला त्या हॉटेल मालकावर ही कारवाईची मागणी संगमनेरकर करत आहेत.
पठारभागात राहणारी एक 14 वर्ष सात महिने वयाची अल्पवयीन मुलगी नजीकच्या गावातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यासाठी ती दररोज आपल्या गावच्या फाट्यावर उभी राहून मिळेल त्या वाहनाने शाळेत जात. त्यातून पंधरा दिवसांपूर्वी पठारावरील शेंडेवाडी येथील गणेश सुखदेव भडांगे (वय 21) हा आपल्या दुचाकीवरुन पीडित मुलीच्या गावाजवळून जात असतांना पीडितेने “लिफ्ट’ देण्यासाठी हात केला. त्यातून गणेश आणि पीडित मुलगी यांची ओळख झाली आणि तुला काही अडचण आल्यास मला सांग असे सांगितले.
गणेश भडांगे याने शनिवारी सकाळी 9 वाजता पीडितेला तिच्या गावाच्या फाट्यावरुन नजीकच्या त्या शाळेत सोडले. त्यानंतर त्याने दीडतासाने सकाळी साडेदहा वाजता पुन्हा शाळेच्या आवारात येवून तिला बोलावून घेतले व आपण बाळेश्वरच्या दर्शनाला जावू असे खोटे सांगत पीडितेला संगमनेरात आणून एका हॉटेलमधील खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. दुपारी तीनच्या सुमारास त्याने पुन्हा संगमनेरातून “त्या’ शाळेत जावून साडेचार वाजता पीडितेला शाळेजवळ सोडले व तो निघून गेला.
पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यातून तिचे अख्खे कुटुंब हादरले. अखेर मध्यरात्री त्यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन करीत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी गणेश सुखदेव भडांगे (वय 21, रा. शेंडेवाडी) याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे कलम 4, 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत आरोपीच्या तत्काळ मुसक्या आवळल्या.