पिंपरी (संदीप घिसे) – पत्नीचा पती व सासरकडच्या व्यक्तीकडून छळ होत असल्याच्या घटना रोज कानावर पडतात. परंतु स्त्रियांप्रमाणे पुरुषांना अनेक प्रकारच्या छळाचा सामना करावा लागतो. परंतु लोक काय म्हणतील या भावनेने अनेक पुरुष तोंड उघडत नाहीत. जेव्हा हा छळ असह्य होऊ लागतो, तेव्हा पुरुषही मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतात. काहीजण तर आत्महत्या देखील करतात. आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांनी पुरुषांना देखील तक्रार करण्याची आणि त्यांच्या समस्या सोडविण्याची सोय करुन दिली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पत्नीकडून पतीचा छळ होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी 10 टक्क्यांवर असलेले तक्रारींचे हे प्रमाण आता तब्बल 30 टक्क्यांवर गेले असल्याचे दिसून येते.
होय, महिलाही पुरुषांवर अत्याचार करतात. पोलीस आयुक्तालयात दाखल होत असलेल्या तक्रारीच्या आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. गेल्या आठ महिन्यांत पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील महिला सहायता कक्षाकडे 278 तक्रारी आल्या असून त्यापैकी 30 टक्के तक्रारी या पुरूषांच्या आहेत.
महिलेकडूनही पुरुषांचा छळ होतो, हे वास्तव स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. पुरुषच महिलेला छळतो यावर समाजाचा दांडगा विश्वास, “महिलेने छळले…’ अशी तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल करून घेतली जात नाही.
पत्नी व तिच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून पुरुषांनी आत्महत्याही केलेल्या आहेत. करोना काळातनंतर पुरुषांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. त्यामुळे घटस्फोटाची प्रकरणेही वाढली. पुरुषांनी अत्याचाराविरोधात खटला दाखल केल्यावर न्यायालयाच्या बाहेरही प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
पुरूषांना हवेत कायद्यात बदल
भारतीय दंड संहिता 498 अ नुसार स्त्रीचा मानसिक शारीरिक छळ केल्यास सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. परंतु, स्त्रीकडून होणाऱ्या छळवणुकीविरोधात 498 ब असे कलमही असावे अशी पुरुष हक्कासाठी काम करणाऱ्या एका समितीची मागणी आहे. कलम 125 अ फौजदारी कायद्यानुसार स्त्री पोटगीची मागणी करू शकते. अगदी त्याच न्यायाने घटनात्मक हक्क पीडित पुरुषांनाही मिळायला हवेत. स्त्रीने पुरुषाकडून पैसा, संपत्ती, घर सगळे लुबाडून घेऊन त्याला घरातून हाकलून दिले तर पुरुषालाही स्त्रीकडून निर्वाह भत्ता देण्याची तरतूद कायद्याद्वारे व्हायला हवी, अशी पुरूष हक्क समितीची मागणी आहे.
अशा आहेत पुरूषांच्या तक्रारी
महिला तक्रार निवारण केंद्राकडे दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये पत्नी तासन्तास सोशल मीडियावर ऍक्टिव असते. पत्नीच्या माहेरकडील व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप, पत्नीच्या चारित्र्यावर संशय अशा तक्रारी असतात. पुरूषांचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केला जातो. त्यात टोमणे मारणे, त्याच्या आई-वडिलांचा अपमान करणे, माहेरची श्रीमंती दाखवणे, मुद्दाम विरोधी वागणे, असहकार्य करणे, मारहाण, उपाशी ठेवणे असे प्रकार महिलांकडून केले जातात. मुख्य म्हणजे गोड बोलून पुरुषाकडून पैसे संपती, घर, बैंक बॅलन्स, क्रेडिट, डेबिटकार्ड काढून घेऊन त्यांना हाकलून देणे असे प्रकार पडत आहेत. विशेष म्हणजे सगळे पैसे काढून घेऊन पुरुषांना बेघर करण्याचे प्रकार ज्येष्ठ नागरिकांबाबत अधिक घडत आहेत. कारण ते अधिक हतबल असतात.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील महिला सहायक कक्षात पूर्वी दहा टक्के पती आपल्या पत्नीबाबत तक्रार करीत होते. आता हे प्रमाण 30 टक्क्यांवर गेले आहे. महिला सहायक कक्षात फक्त महिलाच्या तक्रारीवर समुपदेशन होते असे नाही. पुरूषांच्या तक्रारीवरही समुपदेशन केले जाते.
माधुरी पोकळे, उपनिरीक्षक, महिला सहायक कक्ष