कात्रज -कात्रज उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन दि. 24 सप्टेंबर 2021ला केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले. या कामाची दि. 24 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत असल्याने आगामी सहा महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होणार का? राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम वेळतच पूर्ण होईल, असे सांगण्यात येत असले तरी तूर्तास काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात येण्याऐवजी वंडरसिटी येथून उड्डाणपुलावरून राजस सोसायटीच्या पुढे जाणार आहे. चौकातील वाहूतक पुलावरून गेल्यास पीएमपी बसथांबा किंवा कात्रज मंडईच्या आसपास किंवा सातारा रस्त्यावर आणि वंडरसिटीच्या बाजूने होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. कात्रज चौकातील व राजस चौकातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल. पीएमपी बसथांब्यासाठी जागा उपलब्ध होऊन या ठिकाणीही गर्दी होणार नाही, यामुळे सदर पुलाचे काम वेळेत आणि वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे.
हा उड्डाणपूल राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून जात असून या कामासाठी केंद्र सरकारचा 169.15 कोटी रुपयांचा निधी आहे. हा पूल सहापदरी असून त्याची लांबी 1 हजार 326 मीटर आहे. या कामासाठी अवघे सहा महिने मुदत शिल्लक असताना या पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामाचा वेग वाढविणे गरजेचे असल्याचे, नागरिकांचे म्हणणे आहे.
उड्डाणपुलाची सद्यस्थिती
- कार्यारंभ आदेश : 25 फेब्रुवारी 2022
- कामाची मुदत : 24 महिने
- काम पूर्ण होण्याची तारीख : दि. 24 फेब्रुवारी 2024
- एकूण खांबांची संख्या : सर्व 20 खाबांचे काम पूर्ण
- एकूण पिलर कॅप : 20 पैकी 6 पूर्ण आणि तीनचे काम सुरू
- 19 गर्डर गाळे : 3 गाळ्यांचे काम पूर्ण
- 321 गर्डर : 55 गर्डरचे काम पूर्ण
- सेवा रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण
- रॅम्पसाठी 6 हजार चौ.मी. पॅनल कास्टिंगची गरज
असा असेल उड्डाणपूल…
- एकूण लांबी : 1326 मीटर
- रुंदी : 25.20 मीटर
- दोन्ही बाजूस सात मीटर सर्व्हिस रस्ता
- उड्डाणपुलाचा मार्ग : वंडरसिटी ते माऊली गार्डन
- वंडरसिटी ते कात्रज चौक 5.5 मीटर रुंद स्लीप मार्ग
- एकूण निधी : 169.15 कोटी रुपये