पिंपरी – चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या समोरील जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. इमारतीचा पाया खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आले. ब्लास्टिंगच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्यामुळे परिसरातील एम्पायर स्केअर हाऊसिंग सोसायटीच्या इमारतींना हादरे बसले. तसेच काही सदनिकांच्या खिडक्या व गॅलरीच्या काचांना तडे गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पालिकेने संबंधित ठेकेदाराला ब्लास्टिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाया खोदण्यासाठी मेट्रोप्रमाणे अत्याधुनिक मशीनचा वापर करण्याची सूचना ठेकेदाराला देण्यात आल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.
महापालिकेच्या इमारतीच्या कामासाठी खोदाई केली जात आहे. खोदकाम करण्यासाठी ठेकेदारी कंपनीने ब्लास्टिंगचा वापर केला. अधिक तीव्रतेचे ब्लास्टिंग केल्यामुळे या परिसरातील सोसायट्यांना हादरे बसल्याचा प्रकार घडला. काही सदनिकांच्या काचांना तडे गेले. या प्रकारानंतर येथील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
या संदर्भात रहिवाशांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला ब्लास्टिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ब्लास्टिंग बंद करून मेट्रोने पुण्यात भुयारी मार्ग करताना कोणते मशीन वापरले याची माहिती घेण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. जेणेकरून परिसरातील रहिवाशांना त्रास होणार नाही.
ब्लास्टिंगद्वारे खोदकाम करण्यास मनाई केली
महापालिका इमारतीच्या कामासाठी ठेकेदारांकडून खोदकाम करण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करण्यात आला. शेजारच्या इमारतीमधील सदनिकांतील काचा फुटल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर तात्काळ ब्लास्टिंग बंद करण्यास सांगितले आहे. पुण्यात मेट्रोने भुयारी मार्ग खोदण्यास कोणत्या मशीन वापरल्या आहेत, याची माहिती घेण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. त्यानुसार अत्याधुनिक मशीनचा वापर करून पाया खोदण्याचे आदेश दिले आहेत.
– मकरंद निकम, शहर अभियंता