पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालय, दवाखाने झाले आहेत. या रुग्णालयांत रुग्ण आला असता डॉक्टर रुग्णाची तपासणी करून प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. परंतु ती इतकी शॉटकट आणि रुग्णाला व इतरांना कळणार नाही अशा पद्धतीने लिहिली जाते. अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांनी सुटसुटीत प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याबाबत नियम घालून दिले आहेत. परंतु शहरातील बहुतांश डॉक्टर या नियमाला हारताळ फासताना दिसून येत आहेत. यामुळे रुग्णांची मोठी गोची होत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध परवाना विभागाने (एफडीए) डॉक्टरांनी रुग्णाला देण्याच्या प्रिस्क्रिप्शनबाबतची नियमावली तयार केली आहे. प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांचे नाव मोठ्या अक्षरात, मोठ्या लिपित (कॅपिटल लेटर्स) लिहिणे व त्यातील घटकांची नोंद असणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन हे फक्त औषधविक्रेत्यापुरते असते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण डॉक्टरांनी काय लिहून दिले आहे याचा विचार न करता त्या डॉक्टरच्या जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन येतात. त्यांनी काय लिहून दिले आहे आणि आपण काय घेतले आहे याचीशी रुग्णांना देखील काही घेणे देणे दिसून येत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
डॉक्टरांनी आपल्याला लिहून दिलेली औषधे किती वेळा आणि कशा पद्धतीने घ्यायची आहेत याची माहिती प्रिस्क्रिप्शनवर देणे गरजेचे असताना डॉक्टर त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. काही प्रिस्क्रिप्शनवर डोस कसा घ्यायचा हे कळते परंतु डॉक्टरांचे अक्षरच ओळखू येत नसल्याने गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध परवाना विभागाने डॉक्टरांनी रुग्णांसाठी लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. या नियमांनुसारच प्रिस्क्रिप्शन देणे डॉक्टरांवर बंधनकारक आहे. परंतु बहुतांश डॅक्टर केवळ औषधाचे पहिले एनएसएल लिहून त्याची पावर लिहून देतात. किंवा कोडवर्ड लिहून देत आहेत. ते केवळ त्या डॉक्टरांशी संबंधित मेडिकलवालेच समजतात. त्यामुळे इतर मेडिकलमधून औषधे घेतली तर ती चुकीची आहेत ती परत करून जवळच्या मेडिकलमधून घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णाची लूट होत असून त्याची इच्छा नसताना त्याला डॉक्टरांचे ऐकने भाग पडत आहे.
मोनोपोलीमुळे रुग्ण अडचणीत
मेडिकल क्षेत्रात मोनोपोली औषधांचा ट्रेंड वाढला आहे. एखादी कंपनी अथवा एजन्सी डॉक्टरांशी संगणमत करून आम्ही तुम्हाला अशा कंटेनमध्ये औषधे तयार करून देतो ती तुम्ही लिहा. या परिसरात आम्ही इतर मेडिकलला ती औषधे देणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे आलेला रुग्ण हा तुमचाच असेल त्याला ती औषधे इतर ठिकाणी मिळणार नाहीत. त्यामुळे रुग्णांची मोठी अडचण होत आहे. डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून देण्याचा सरकार आग्रह करत आहे परंतु याकडे मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट होत आहे.
असे हवे प्रिस्क्रिप्शन
सुरुवातीला डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक आवश्यक.
रुग्णाचे नाव, पत्ता, तारीख, लिंग, वय, वजन यांचा स्पष्ट उल्लेख अनिवार्य.
औषधाचे नाव मोठ्या लिपीत (कॅपिटल लेटर) लिहिणे आवश्यक.
त्या औषधांतील घटकांची नोंद असणेही अनिवार्य.
तेच घटक असणारी स्वस्त जेनेरिक औषधे देण्याची परवानगी.
अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कशा पद्धतीने लिहावे यासंबंधी नियमावली तयार केली होती. परंतु डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलने ती नियमावली मान्य न केल्याने काही करता येत नाही. आपण मेडिकलशी निगडित काम करतो. डॉक्टरांना आपण काही सांगू शकत नाही. सध्या जनेरिक मेडिसीन संबंधीदेखील शासनाने कायदा केला होता परंतु तो पुन्हा रद्द केला आहे. परंतु डॉक्टरांनी किमान वाचता येईल अशा पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहिणे आवश्यक आहे.
– श्याम प्रतापवार, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे.
डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटर्समध्ये आणि वाचता येईल अशा अक्षरांत लिहून द्यावी. औषधांचा डोस कसा घ्यायचा आहे याची व्यवस्थित माहिती द्यावी. औषध याच ठिकाणावरून अथवा मेडिकलमधून घ्या अशी सक्ती करू नये. जे औषधे लिहून दिली आहेत त्यामध्ये काय आहे याची माहिती द्यावी. कोणत्याही एका कंपनीचेच औषध घेण्याची सक्ती करू नये. त्या कंटेनमध्ये दुसऱ्या कंपनीचे औषध घेतले तरी चालेल अशी नोट देणे बंधनकारक आहे.
डॉ. सुनील मित्तल, वैद्यकीय तज्ज्ञ.