पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेने जुनी सांगवी येथे 76 गाळ्यांची राजीव गांधी भाजी मंडई मागील काही वर्षांपूर्वी बांधली आहे. परंतु येथे भाजी विक्रेत्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने सध्या ही मंडई धूळ खात पडून आहे. या मंडईच्या जवळच असलेल्या मैदानात सध्या सांगवी येथील भाजी मंडई भरत आहे. त्यामुळे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून देखील भाजी मंडई धूळ खात पडून असून भाजी विक्रेते मैदानावर व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे.
राजीव गांधी भाजी मार्केटमध्ये छोटे गाळे, गाळ्यांच्या संख्येच्या तुलनेत तिपटीने असणारे भाजीविक्रेते, पालिकेचे न परवडणारे भाडे व पूर्वी गल्लोगल्ली फेरी करून होणारी भाजी विक्रीचा परिणाम यामुळे भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने हे भाजी मार्केट धूळ खात पडून आहे. पालिकेकडून व तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून दोन वर्षांपूर्वी येथील डागडुजी, सुशोभीकरण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा खटाटोप करण्यात आला. पुन्हा काही दिवसांनंतरच भाजी विक्रेत्यांनी या भाजी मार्केटकडे पाठ फिरवली. यामुळे सुशोभीकरणचा खर्च वाया गेला. या आधी मुख्य रस्त्यावर होणारी भाजी विक्रीचा रहदारीची समस्या निर्माण झाल्याने काही काळ ढोरेनगर गल्ली व रस्त्याकडेला भाजी विक्री करण्यात येत होती. त्यानंतर भाजी मार्केटच्या शेजारी असणाऱ्या गजानन महाराज मंदिरासमोरील मोकळ्या मैदानावर गेली दोन वर्षांपासून भाजी मार्केट सुरू करण्यात आले. शेजारीच छत, पाणी, लाईट व मूलभूत सुविधा असणारे भाजी मार्केट मात्र धूळ खात पडून आहे.
गेली अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. भाजी विक्रेत्यांना पालिकेचे भाडे परवडत नसल्याची आधी तक्रार होती. विक्रेत्यांचा विचार करून सर्वांना यात सामावून घेणे गरजेचे आहे.
– बाबासाहेब ढमाले, अध्यक्ष अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ.
येथील परिस्थितीची माहिती अडचणी लक्षात घेऊन भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न
करण्यात येईल.
– उमाकांत गायकवाड, उपायुक्त महापालिका.
सांगवीतील राजीव गांधी भाजी मंडई गेली पंधरा वर्षांपासून 76 गाळे धूळ खात पडून दोनदा खर्च करूनही प्रयत्न फसला. भाजी विक्रेत्यांचे म्हणणे व मागण्या ऐकून प्रशासनाकडून भाजी मंडई सुरू करावी असा मत प्रवाह भाजी मंडई पुन्हा सुरू झाल्यास मैदान मोकळे राहणार
पार्किंग व रहदारीचाप्रश्न मार्गी लागेल.
शाळे समोरचा गजबजाट कमी होणार.
सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमास मैदान मोकळे राहील.
सर्व सुविधा देऊनही भाजीविक्रेत्यांची पाठ
सर्व सुविधा पुरवूनही गेली अनेक वर्षांपासून हे भाजी मंडई बंद आहे. लोकप्रतिनिधी, भाजी विक्रेते व पालिका प्रशासन यांचा समन्वय न झाल्याने सद्यःस्थितीत भाजी मंडई धूळ खात पडून आहे. भाजी विक्रेत्यांची संख्या लक्षात घेऊन ज्या त्या भागात हॉकर्स झोन निर्माण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा दोन वर्षांपूर्वीचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्नही फसला.तो प्रशासनाकडून तरी पूर्ण होऊन भाजी विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून समन्वय साधून पालिका प्रशासनाने येथील भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावावा.असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
कार्यक्रमावेळी भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर
मध्यवर्ती ठिकाणी असलेले जुनी सांगवीतील हे एकमेव मैदान आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मैदानाचा पूर्वीपासून उपयोग केला जातो. येथे मोठ मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दिवाळी पहाट, अखंड हरिनाम सप्ताह, संगीत महोत्सव अशा कार्यक्रमावेळी भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर केले जाते. यामुळे पार्किंग व रहदारीची समस्या निर्माण होते. शेजारीच उपलब्ध असणाऱ्या भाजी मार्केटमध्ये न जाण्याची उदासीनता कशासाठी असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.