कराड – यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ अंतर्गत ‘पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते व कराड अर्बन बॅंकेचे चेअरमन डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, राहुल पुरोहित, डॉ. राहुल फासे, संदीप कोटणीस, नगर अभियंता ए. आर. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोबाईल, सोशल मीडिया व चंगळवादी संस्कृतीतून मुलांना बाहेर काढत वाचनाबाबत मुलांमध्ये ओढ निर्माण व्हावी, यासाठी गेल्या तीन वर्षापासून माजी नगरसेवक सौरभ पाटील हे कराड शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी मित्रांसाठी स्व. यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ राबवत आहेत. यामध्ये सहभागी वाचकांना कराड नगरपालिका नगर वाचनालयाचे निःशुल्क सभासदत्व देण्यात येते. शहरातील 2500 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होत ही चळवळ यशस्वी केली आहे.
बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळ वाढावी, हाच उदात्त हेतू यामागे असून सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ’ हा उपक्रम 15 जून पर्यंत सकाळी 8 ते 10 या वेळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नगरवाचनालयात येऊन आपले ओळखपत्र जमा करून हवे ते पुस्तक घेऊन याठिकाणी वाचन करावे, असे आवाहन सौरभ पाटील यांनी केले.
ही अभिनव बाग यशवंतराव चव्हाण स्मृति सदनच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात साकारली गेली आहे. या जागेत कट्टे बांधण्यात आले आहेत. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. पुस्तकांची बाग असे रेखाटन करण्यात आले आहे. झाडांवर वाचनालयातील बालसाहित्याचे फोटो लावण्यात आले आहेत. आकर्षक चित्रेही ठेवण्यात आली आहे. मुलांना रमणीय परिसर करण्यात आला आहे. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कराड, लायन्स क्लब ऑफ कराड, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे सदस्य, लोकशाही आघाडीचे पदाधिकारी, वाचनप्रेमी, पर्यावरणप्रेमी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.