पिंपरी – प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटीच्या ताफ्यात 50 आरामदायी रातराणी दाखल होणार आहेत. दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेत ही बांधणी केली जात आहे. सध्या 10 रातराणीची बांधणी पूर्ण झाली असून या आठवडयात आणखीन दहा रातराणीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीही झाली आहे.
नवीन रातराणी ही बस 12 मीटर लांब, 2.6 मीटर रुंद आणि 3.6 मीटर उंच अशी बस आकर्षक रंगसंगतीत बांधण्यात आली. हवेचा अवरोध कमी करण्यासाठी एरोडायनॅमिक आकार आहे. चालक केबिनमध्ये उद्घोषणा यंत्रणा आणि संकटसमयी प्रवाशांना सावध करण्यासाठी अलार्म यंत्रणा कार्यान्वित आहे. गाडी मागे घेताना कॅमेराची सुविधा दिली आहे. त्यासाठी स्क्रीन चालकाच्या केबिनमध्ये देण्यात आली आहे. मुंबई-कोकणसह मुंबई-लातूर मार्गावर ही रातराणी चालवण्याचे प्रस्तावित आहे. सप्टेंबरअखेर एकूण 50 रातराणी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे.
या बसमध्ये प्रवासी झोपून प्रवास करू शकतील, अशी व्यवस्था असणारी दोन अधिक एक या प्रमाणे एकूण 30 आसने गाडीत आहे. प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र खिडकी आणि उजेडाचा त्रास कमी करण्यासाठी पडदे लावण्यात आले आहेत. प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र मोबाइल चार्जिंग सुविधा, मोबाइल, पाण्याची बाटली, वृत्तपत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे करण्यात आली आहे. आसनांवरील गादी आणि उशीसाठी रेक्झिनचे कापड असणार आहे. वाचनासाठी पांढरे दिवे आणि रात्री वापरासाठी निळ्या प्रकाशाच्या एलईडी दिव्यांची प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. वरील बाजूस आसनांवर जाण्यासाठी शिडी आणि हॅंडलची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी पहिल्या क्रमांकाचे आसन राखीव आहे.
संकटात उपाययोजना
संकटाच्या वेळी बाहेर पडण्यासाठी मागच्या बाजूला आपत्कालीन दरवाजा, बसच्या छतावर आणि चालकाच्या केबिनमध्ये एक असे चार मार्ग देण्यात आले आहेत. काच फोडण्यासाठी गाडीत हातोडे देण्यात आले आहेत. आग विझवण्यासाठी चार आणि सहा किलोची प्रत्येकी एक अग्निशमन यंत्रणा आहे. इंजिनने पेट घेतल्यास आग विझवण्यासाठी एफडीएसएस यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली प्रवाशांसाठी आरामदायी रातराणी बसची बांधणी सुरू आहे. सध्या 10 बस तयार करण्यात आल्या असून येत्या आठवड्यात आणखीन दहा बस तयार करणार आहे. तसेच सव्वा महिन्याच्या आत 50 आरामदायी रातराणीची सुविधा देऊ.
– दत्तात्रय चिकोर्डे, व्यवस्थापक, दापोडी, एसटी कार्यशाळा.