पिंपरी – गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड शहरातील दोन लाख 86 हजार 673 लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये चिंचवड आणि पिंपरी शिधापत्रिका कार्यालयातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना रवा, चनाडाळ, साखर तसेच पामतेल मिळणार आहे.
राज्यशासनाकडून यापूर्वी दिवाळीत आनंदाचा शिधा दिला होता. मंगळवारी (दि. 21) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. पात्र शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉस मशीनद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अंत्योदय योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. चिंचवड अ झोन कार्यालयांतर्गत एकूण 40 हजार 579 शिधापत्रिकाधारक त्यासाठी पात्र ठरत आहेत. यामध्ये 1 लाख 50 हजार 211 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा भेटणार आहे. या बरोबरच पिंपरी ज झोन कार्यालयांतर्गत 36 हजार 097 शिधापत्रिकाधारक पात्र ठरत आहेत. या शिधापत्रिकाधारकांतर्गत 1 लाख 36 हजार 462 लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. मंत्रिमंडळ निर्णय झाला आहे. शासन निर्णय होऊन पुढील आठवड्यापासून त्याचा लाभ मिळण्यास सुरूवात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाईल. मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आहे. शासन निर्णय होऊन तशा सूचना आम्हाला दिल्या जातील. त्यानुसार शहरातील दोन लाख 86 हजार 673 जणांना त्याचा लाभ होईल.
– दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय.