पिंपरी – अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. अद्याप काही कामे बाकी असल्याने याचे उद्घाटन रखडले आहे. नोव्हेंबर महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता रुग्णालय प्रशासन वर्तवित होते. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त मिळाला नाही. परिणामी पूर्ण क्षमतेने महाविद्यालय कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत ११ मजल्यांची आहे. यामध्ये बेसमेंटमधील काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले. यंदाचे पाचवे वर्ष आहे. इमारतीची बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहे. वाहनांच्या पार्किंगची सुविधा आहे. ग्राऊंडला नाइट शेल्टरची आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर देखील वाहने पार्किंगची सुविधा आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर बीएसस्सी नर्सिंग आणि बीपीएमटी महाविद्यालय, पाचव्या मजल्यावर सर्व्हींस फ्लोअर, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सुविधा, आठव्या, नवव्या आणि दहाव्या मजल्यावर विद्यार्थी वसतिगृह तर ११ व्या मजल्यावर कार्यक्रमासाठी सभागृहाची सुविधा आहे.
सध्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. शासनाच्या सर्व परवानगी घेण्यात आल्या. आवश्यक पदे आणि विद्यार्थी संख्या देखील पुरेशी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमच्या (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय) वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता होती. उद्घाटनानंतर नव्या इमारतीत महाविद्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात विद्युत विभागाची, फर्निचरची किरकोळ कामे बाकी होती. सध्या लिफ्ट बसविण्याचे काम सुरू आहे. अद्याप त्याची सुरूवात झालेली नाही. हे काम पूर्ण होण्याला आणखी काही महिने लागणार आहेत. ही इमारत पूर्ण झाल्यास शहरातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होण्यास अवधी आहे. अद्याप काही कामे शिल्लक आहेत. सध्या लिफ्ट बसविण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन होईल.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पीजी महाविद्यालय, वायसीएम.