पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक असलेल्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. पुढील काही दिवसात याबाबत शासनाचा आदेश निघण्याची शक्यता आहे. एक अपर पोलीस आयुक्त, दोन उपायुक्त ही पदे अंतिम टप्प्यात असून आणखी चार सहायक आयुक्तांची पदे मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सन 2018 साली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सध्या आयुक्तालय बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे आयुक्तालयाला जमिनीपासून मनुष्यबळ आणि संसाधनांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे. आयुक्तालयाच्या सुरुवातीला पुणे आयुक्तालयातून नऊ आणि पुणे ग्रामीण मधून पाच पोलीस ठाण्यांचा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश करण्यात आला. काही दिवसात चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याने शहर हद्दीतील पोलीस ठाण्यांची संख्या 15 झाली. शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सुरुवातीलाच तीन परिमंडळ करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि अधिकारी असल्याने तो प्रस्ताव बारगळला. दरम्यान त्यांनी दोन परिमंडळ, पाच गुन्हे शाखा युनिट तयार केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात शिरगाव आणि रावेत पोलीस ठाणे नव्याने कार्यान्वित झाले. चाकण मधून विभाजित झालेले महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्याने त्या पूर्ण करून जानेवारी 2023 मध्ये महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे सुरू झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुणे शहर आयुक्तालयाच्या जवळपास क्राइम रेट आहे. मात्र पुण्याच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळ आणि अधिकारी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी अधिकाऱ्यांची गरज आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी एक अपर आयुक्त, दोन उपायुक्त आणि चार सहायक आयुक्त पदांची निर्मिती होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यातील अपर आयुक्त आणि उपायुक्त पदांची मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये याबाबत शासन स्तरावरून आदेश येण्याची शक्यता आहे. तसेच चार सहायक आयुक्त पदे निर्मितीच्या प्रस्तावाचा युद्ध पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.
अपर आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त पदांची नव्याने निर्मिती होण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असून लवकरच काही पदे मंजूर होतील.
– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त