पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – शहरात स्वतःचे घर असावे, असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. मात्र, शहरातील वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेतल्यावर शहरात वन बीएचके सारखा फ्लॅट घेतात. त्यातही म्हाडाची घरे घेण्यासाठी नागरिकांचा गेल्या काही वर्षात उड्या पडायच्या. मात्र, आता म्हाडाच्या सदनिका घेण्यास नागरिकांची उदासिनता दिसून येऊ लागली आहे. शहरातील पिंपरी वाघेरे, ताथवडे आणि म्हाळुंगे या भागातील म्हाडाच्या तब्बल 2 हजार 834 सदनिका धूळखात पडून आहेत. या सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाला मार्केटींग एजन्सीचा टेकू घेण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे तर आशिया खंडात सर्वाधिक झपाट्याने वाढणाऱ्या शहरामध्ये वरच्या क्रमांकावर येत आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील नागरिकांची पहिली पसंती पिंपरी-चिंचवड शहराला असते. शहराची सुमारे 27 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यामुळे शहरात फ्लॅट घेणे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटच्या बाहेर जाते. अशा परिस्थितीत अनेकजण शहरालगतच्या भागाला प्राधान्य देतात. त्यातही म्हाडा सारख्या घरांना काही वर्षांपूर्वी नागरिकांची मोठी पसंती होती. म्हाडाच्या घराचे अर्ज सुटल्याची माहिती मिळते की नाहीतोपर्यंत हजारो नागरिक अर्ज करत होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत म्हाडाच्या सदनिका घेण्यास नागरिकांची उदासिनता दिसून येत आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांच्यातर्फे ताथवडे, पिंपरी वाघेरे, चाकणमधील म्हाळुंगे या भागात विविध उत्पन्न गटाअंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आले आहेत. या तिन्ही गृहनिर्माण प्रकल्पामधील सदनिकांची विक्री करण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. सोडतीमध्ये काही सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. ताथवडे येथे 650, पिंपरी वाघेरे 644, म्हाळुंगे येथे 1 हजार 540 अशा 2 हजार 834 सदनिकांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी म्हाडाने उर्वरीत सदनिकांसाठी जाहिरात देऊन देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता म्हाडाने रिक्त सदनिकांची विक्री करण्यासाठी मार्केटींग एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्हाडाच्या वतीने वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली असून निविदा मागविण्यात आली आहे. इच्छूक जाहिरात एजन्सीला पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे येथे 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2022 या कालावधीत निविदा भरावी लागणार आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.
दरम्यान, म्हाडाच्या सदनिका घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी नागरिकांच्या उड्या पाडायच्या. आता मात्र, म्हाडाच्या सदनिका घेण्यास दिवसेंदिवस नागरिक उदासिन होत असल्यामुळे म्हाडाला सदनिका विक्रीसाठी मार्केटींग एजन्सीची नेमणूक करावी लागत आहे.