पिंपरी – प्लेटलेटसच्या निर्मीतीत शहरातील सामाजिक संस्थांशी भूमिका महत्वाची ठरत आहेत. या संस्था आपले रक्तदाता आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देत असल्याने प्लेटलेटसचा तुटवडा जाणवत नाही. डेंग्यूमध्ये प्लेटलेटस कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दिवसाकाठी २० प्लेटलेटसच्या बॅगची मागणी रुग्णांकडून होत आहे. काही वेळा दिवसाकाठी ४० बॅग देखील रुग्णांचे नातेवाइक घेऊन जात आहेत. प्लेटलेटसच्या वाढत्या मागणीबरोबरच तुटवडा होऊ नये, यासाठी या सामाजिक संस्थांचा रुग्णांना आधार मिळत आहे.
शहरात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या बरोबरच मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण देखील आढळत आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख ५० हजार ८९६ मलेरियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या पैकी २५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. या वर्षी चिकनगुनियाचे ६६ संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एकाही रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही. मात्र, शहरात डेंग्यूचे ११ हजार २५३ संशयित रुग्ण आढळले असून २५४ रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
या पैकी एका रुग्णाचा डेंग्यूने मृत्यूही झाल्याची नोंद आहे. डेंग्यूमध्ये रुग्णांच्या प्लेटलेटसची संख्या झपाट्याने खाली येते. त्यानंतर रुग्णाला आपला जीव देखील गमवावा लागण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून डाॅक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना प्लेटलेटच्या बॅगची नोंदणी करायला सांगतात. त्यानुसार वायसीएम रुग्णालयात दररोज २० ते २५ जणांकडून मागणी होत आहे. सोमवारी (दि. २५) ४० प्लेटलेट बॅग दिल्याची माहिती ब्लड बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात रक्तदान करणाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. रक्तदान घेणारे शासकीय ब्लड बॅंकेला रक्त पिशव्या देतीलच असेही नाही. अशावेळी अचानक प्लेटलेटसच्या बॅगची मागणी वाढल्यानंतर काय करायचे, असा प्रश्न शासकीय ब्लड बॅंकेसमोर असतो. अशा वेळी पिंपरी-चिंचवड शहरातील पाच ते सहा सामाजिक संस्थांनी वायसीएमच्या ब्लड बॅंकेला संपर्क केला असून गरज असेल तेव्हा रक्तदाते देखील पाठविण्याची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे प्लेटलेट बॅगची निर्मीती करता येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रुग्णांच्या नातेवाइकांकडून दिवसाकाठी आमच्याकडे किमान २० प्लेटलेटसच्या बॅगची मागणी होते. काही वेळा अधिकच बॅग दिल्या जातात. तर काही दिवस ही मागणी घटलेली असते. प्लेटलेट कमी पडल्यानंतर आम्ही सामाजिक संस्थांशी संपर्क साधतो. त्यानुसार संस्था आपला रक्तदाता आमच्याकडे पाठवितात. त्यांनी रक्तदान केल्यानंतर आवश्यक प्लेटलेटसची निर्मीती केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी या बॅग आम्ही उपलब्ध करू शकतो.
– शंकर मोसलगीकर, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम.