पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील मेट्रोच्या स्थानकांपासून परिसरातील शेअर रिक्षाचे प्रवासी भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी (दि. 9) जाहीर केले. यामध्ये रिक्षाचे किलोमीटरसाठी असणारे दर निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा संघटनांना केले आहे. घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना शेअर रिक्षा उपयुक्त ठरणार आहे.
शेअर रिक्षाचे भाडे ठरविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, बघतोय रिक्षावाला, शिवनेरी, आप रिक्षा संघटना, सावकाश संघटना, आझाद हिंद संघटना आदी विविध संघटनांची तीन वेळा बैठक घेतली होती. तसेच दोन्ही शहरांत सर्वेक्षण केले. त्यानंतर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरांत मेट्रोची 18 स्थानके आहेत. त्यामधील बहुतेक स्थानकांच्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात शेअर रिक्षा धावणार आहे. पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानकापासून 10 किलोमीटरच्या परिसरात शेअर रिक्षाची वाहतूक होणार आहे. प्रवासी आणि चालक, या दोन्ही घटकांना शेअर रिक्षा फायदेशीर ठरू शकते. त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.