पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्रकल्प भूमापन, नदी सुधारण प्रकल्प, टीपी स्कीम, रिंगरोड अहवाल तयार करण्यासाठी राबविण्यात येणारी ड्रोन यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरत आहे. हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जिओ स्मार्ट 2023 या आंतरराष्ट्रीय परिषदेत ड्रोन प्रकल्पाचे सादरीकरण प्रभावशाली ठरले.
जिओ स्मार्ट 2023 आंतरराष्ट्रीय परिषद हैदराबाद येथे पार पडली. यामध्ये सुदूर संवेदन, भौगोलिक माहिती प्रणाली, जीपीएस प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान प्रसार करण्याकरिता विविध देशातील नामवंत एजन्सींनी सहभाग घेतला होता. परिषदेत रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जीपीएस या भौगोलिक माहिती तंत्रज्ञान माहितीचे अदान प्रदान करण्यात आले.
पीएमआरडीए ही इन-हाऊस ड्रोन वापर करणारी संस्था असून ड्रोनद्वारे केलेल्या कामांचे सादरीकरण माजी महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले. त्यामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, नगर रचना योजनाचे नियोजन, सुविधा भूखंडाचे हस्तांतरण, 65 मीटर इनर रिंग रोडचा प्रकल्प अहवाल आदी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. इस्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार यांनी शासकीय विभागामध्ये ड्रोन वापर संकल्पनेचे अभिनंदन केले
प्राधिकरणामार्फत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून नगर रचना योजनांचे नियोजन, रिंग रोड नियोजन, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठीचा अभ्यास करण्यात आला. या सर्व प्रकारच्या अंमलबजावणीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत आहे.
– रामदास जगताप,उपजिल्हाधिकारी तथा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी