पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक मार्च रोजी दोन कोटींच्या मेफेड्रोनसह एका तरुणाला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले असून पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक देखील या रॅकेटमध्ये असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्या उपनिरीक्षकास अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.
विकास शेळके असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ( Police Officer Vikas Shelke Arrested With Drugs Valued At ₹45 Crore ) तो निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. नमामी शंकर झा (३२, रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. एकजण पिंपळे निलख परिसरात ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोेलिसांना मिळाली.
त्यानुसार सापळा रचून नमामी झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत उपनिरीक्षक विकास शेळके यांनी हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. शेळकेकडून ४५ कोटी रुपये किंमतीचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.