पिंपरी – रस्ता ओलांडत असताना खबरदारी न घेता महिलेने अचानक रस्त्यावर येऊन एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार घसरून रस्त्यावर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडली.
ओंकार सुनील सोनावणे (वय 20) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश आंबवणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर थंडा मामला हॉटेल समोर रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग नसताना महिला रस्ता ओलांडत होती. दरम्यान, रस्त्याने ओंकार सोनवणे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/एचटी 4763) जात होते. महिला रस्त्याच्या दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांमधून अचानक रस्त्यावर आली. तिची ओंकार यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात ओंकार हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. आरोपी महिला देखील जखमी झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.