- अफवांवर विश्वास ठेवू नका – श्रावण हर्डीकर; उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही चर्चा नाही
पिंपरी – दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोनाच्या प्रादुर्भावाने पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल, असे सोशल मीडियावर मेसेज व दोन महिन्यांपूर्वीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, ही केवळ अफवा असून लॉकडाऊसंदर्भात निर्णयच नव्हे तर साधी चर्चादेखील झालेली नसल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन होणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
23 मार्चपासून कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते. यानंतर 19 मे पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये सवलत जाहीर करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये सवलत जाहीर करताना करोनासंदर्भात काही नियमावली लागू करण्यात आली होती. मात्र या नियमावलीचे पालन होत नसल्यामुळे शहरातील करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडू लागल्याने जुलै महिन्यात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचाही अपेक्षित परिणाम रुग्णसंख्या रोखण्यात झाला नसल्याचेच सध्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहरातील दैनंदिन रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे. तर शनिवारी (दि. 12) रुग्णसंख्येने दीड हजारांचा आकडा ओलांडला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या अफवांना शहरात उधाण आले होते. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे, पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत वाढत्या रुग्णांबाबत बरीच चर्चा झाल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार, अशी अफवा शहरात दोन दिवसांपासून रंगली होती. तर सोशल मीडियावर काही व्हीडिओही व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
मात्र उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये केवळ रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, करोनाच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी व प्रशासकीय सुधारणांबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणार नसल्याचेही स्पष्ट झाले असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध
23 मार्चपासून झालेल्या लॉकडाऊनमुळे कंपन्यांसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अद्यापही लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीतून व्यापारी बाहेर पडले नाहीत. जुलै महिन्यात झालेल्या लॉकडाऊनलाही व्यापाऱ्यांचा विरोध होता. हा विरोध डावलून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्याचाही फटका व्यापाऱ्यांना बसला होता. या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा कडवा विरोध आहे. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करणे तितके सोपे नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनसंदर्भात सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. पालकमंत्र्यांनीही लॉकडाऊनसंदर्भात सूचना केलेली नसून सध्या केवळ अफवा सुरू आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. करोनाचे रुग्ण वाढत असून, नागरिकांनी करोनासंदर्भात ठरवून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करावा.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका