पिंपरी -महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या गुजरातला गेल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे उद्योग भाजपकडून सुरु आहेत. त्यामुळेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी भाजपने गुजरातच्या “टोरेंट” या खासगी वीज पुरवठा कंपनीपुढे पायघड्या घातल्या आहेत. महाराष्ट्राची मान केंद्रापुढे आणि गुजरातपुढे तुकवून सत्ता टिकविण्यासाठी लाचारी पत्करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महावितरणच्या खासगीकरणास विरोध दर्शविण्यासाठी नुकतेच महावितरणच्या कर्मचारी आणि अभियंत्यांनी संप पुकारला होता. त्यांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसून लागलीच गुजरातच्या खासगी वीज कंपन्यांपुढे पायघड्या घातल्या आहेत. भाजप नेत्यांचा सत्तेचा हा सोस पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना नाहक सोसावा लागणार असल्याचा टोला गव्हाणे यांनी पत्रकातून लगावला.
गुजरातच्या अहमदाबाद शहरातील टोरेंट कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीज वितरण करण्याचा परवाना मागितला आहे. टोरेंटला परवानगी मिळाल्यास महावितरणबरोबर ही कंपनीही शहरात वीज वितरणात उतरेल. टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीने त्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज कायद्यानुसार अर्ज दाखल केला असून तो आयोगाने स्वीकारला आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. अर्जात नमूद केल्यानुसार या कंपनीचे पुणे जिल्ह्यात वीज वितरणाचा परवाना मिळाल्यापासून पाच वर्षांत सहा लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देणार असल्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र केंद्राची मर्जी सांभाळण्यासाठी राज्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या बेफिकीर राज्यकर्त्यांनी आता महावितरणासोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वीज ग्राहकांनाही वेठीला धरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यासाठी अहितकर निर्णय घेणाऱ्या भाजप नेत्यांना जनता आगामी निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही गव्हाणे यांनी पत्रकातून दिला.