- वैद्यकीय विभागाचा अजब कारभार; टेक्निकल स्पेसिफिकेशनमध्येही गडबड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लुटीचे अजब प्रकार समोर येत असताना आज पुन्हा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. गरोदर महिलांच्या तपासणीसाठीचे “सर्विकोस्कोप’ यंत्र अवघ्या दोन लाख रुपयांना उपलब्ध असताना हे यंत्र तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांना घेण्याचा घाट वैद्यकीय विभागाने घातला आहे. एकाच कंपनीचे स्पेसिफिकेशन टाकत यामध्ये कोणीही पात्र होणार नाही, याची काळजी निविदा प्रक्रियेतच घेण्यात आली असून सत्ताधारी आणि प्रशासनाने केलेल्या प्रकाराची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयांसाठी “सर्विकोस्कोप’ हे यंत्र खरेदी केले जाणार आहे. दहा मशीन खरेदीसाठी 1 कोटी 15 लाख रुपयांची निविदा भांडार विभागाने प्रसिद्ध केली आहे. स्पेसिफिकेशन नमूद करून त्याची मागणी वायसीएम रुग्णालयाकडून भांडार विभागाकडे नोंदविण्यात आली होती. या मागणीनंतर हे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बाजारामध्ये “सर्विकोस्कोप’ ही मशीन विविध प्रकारात उपलब्ध आहे. अत्यंत उच्च दर्जाची अथवा “यूएस’ अथवा “यूके’ ब्रॅंडेड मशीन खरेदीसाठीही 4 ते सहा लाख रुपयांचा दर उपलब्ध आहे.
मात्र, महापालिकेने केवळ एकाच कंपनीचे “सर्विकोस्कोप’ हे मशीन पात्र ठरावे यासाठी पाषाण येथील एका कंपनीचे स्पेसिफिकेशन जाणीवपूर्वक त्यामध्ये नमूद केले आहे. या स्पेसिफिकेशनचे मशीन केवळ एकाच कंपनीकडे उपलब्ध असल्यामुळे या निविदा प्रक्रियेमध्ये स्पर्धाच होणार नाही, हे कटू सत्य आहे.
केवळ काही राजकीय व्यक्तींच्या फायद्यासाठी राबविण्यात येत असलेली ही निविदा प्रक्रिया महापालिकेत चर्चेचा विषय ठरली आहे. ठराविक कंपनी डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविणे हे बेकायदेशीर ठरते हे माहिती असतानाही सुरू असलेल्या प्रकारावर आयुक्तही मौन बाळगून आहेत. यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक निविदा प्रक्रियेप्रमाणे हा प्रकारही झाकून जाईल, या उद्देशाने राबविण्यात आलेली निविदा सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
मशीनबाबत साशंकता…
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ज्या कंपनीचे स्पेसिफिकेशन निश्चित केले आहेत. त्या कंपनीने शासकीय रुग्णालयात या मशीनचा पुरवठा केल्याचे स्पष्ट झालेले नाही. तसेच या “सर्विकोस्कोप’च्या वापराबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. केवळ एकाच कंपनीचे तीन अधिकृत वितरक दाखवून त्यांच्यामध्येच स्पर्धा केली जाणार असून रिंग गठीत करून हे मशीन खरेदी केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
किंमतीमध्ये तफावत
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेतील “सर्विकोस्कोप’चे स्पेसिफिकेशन हे अत्याधुनिक “सर्विकोस्कोप’शी साधे मिळते-जुळतेही नाहीत. जे स्पेसिफिकेशन टाकण्यात आलेल्या मशीनची किंमत दोन लाखांपेक्षाही अधिक नाही. हे मशीन महापालिका तब्बल 11 लाख 50 हजारांना खरेदी करणार आहे. एका मशीनमागे तब्बल 9 ते साडेनऊ लाख रुपये “डकारले’ जाणार आहेत. हे कोणाच्या घशात जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखादी ठराविक कंपनी पुढे करून त्यातून स्वत:चे उखळ पांढरे करणारी राजकीय यंत्रणा सध्या महापालिकेत कार्यरत असल्याचेही या प्रकारामुळे उघड झाले आहे.
निविदा रद्द करा
ठराविक कंपनी डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेली निविदा ही बेकायदेशीर ठरवून ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. साडे अकरा लाखांना एक मशीन हे दरपत्रक कशाच्या आधारे निश्चित केले? त्यामागील प्रशासकीय सूत्रधार कोण? असे प्रश्न उपस्थित झाले असून ठराविक लोकांच्या हितासाठी प्रशासनामधील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.