नवी दिल्ली : करोना काळातील लॉकडाऊन आणि आता आलेली करोना प्रतिबंधक लस यामुळे सर्वत्र सकारात्मक वातावरण झाले आहे. त्यातच आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे.
सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. परीक्षा 4 मे ते 10 जून या काळात ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
करोनाचा आपण सर्वांनी समर्थपणे सामना केला आहे. आता आपण कोरोनातून हळूहळू मुक्त होत आहोत.
४ मेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा, असं मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे. तसेच दोन करोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान एप्रिलममध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅडमिट कार्ड मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.
परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.
या ठिकाणी आणि अशा प्रकारे पाहता येईल वेळापत्रक
१. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला सर्वात आधी भेट द्या.
२. लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.
३. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचे वेळापत्रक दिसेल.
४. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करू शकता.