पिंपरी – खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ केली. मात्र, या दरवाढीला शहरवासियांसह सांस्कृतिक क्षेत्रातून मोठा विरोध सुरू होता. वाढत्या विरोधानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेत नाट्यगृहांच्या भाड्यात 50 टक्क्यांनी कपात केली आहे. सुधारित आणि नवीन दरांची 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर अशी पाच नाट्यगृहे महापालिकेने उभारली आहेत. खासगी सभागृहांपेक्षा नाट्यगृहाचे दर कमी होते. परंतु, खर्चापेक्षा उत्पन्न कमी, अनेक वर्षांपासून भाडेवाढ केली नसल्याचे कारण देत प्रशासकांनी नाट्यगृहांच्या भाड्यात 1 जुलैपासून मोठी वाढ केली होती. त्याचा परिणाम नाट्यगृहाच्या नोंदणीवर झाला. नागरिकांनी नाट्यगृहाऐवजी हॉटेल, मंगल कार्यालये, पुण्यातील कमी भाडे असलेल्या सभागृहात कार्यक्रमास पसंती दिली. परिणामी, महापालिकेच्या उत्पनावर परिणाम होऊ लागला होता. शहरातील लोकप्रतिनिधीनींही भाडेवाढीस विरोध केला. अखेरीस प्रशासनाने 50 टक्क्यांनी भाडेवाढ कमी केली.
मोफत, नाममात्र शुल्क असलेल्या हौशी कलाकार, प्रायोगिक रंगभूमीच्या कार्यक्रमांसाठीचे दर कमी केले आहेत. खासगी संस्था, शाळांच्या भाड्यात 50 टक्के कपात केली आहे. महापालिकेच्या विविध विभागासाठी 50 टक्के तर इतर शासकीय कार्यक्रमांसाठी 30 टक्के सवलत देण्यात आली आहे.
– मनोज लोणकर, उपायुक्त क्रीडा विभाग
असे आहेत सुधारित दर
आचार्य अत्रे रंगमंदिर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मोफत असलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी पाच हजार 400, तिकीटांच्या कार्यक्रमांसाठी सात हजार 200, शाळांना तीन तासाकरिता 11 हजार 250, तिकीट असल्यास 13 हजार 500 रुपये, महाविद्यालयांना पाच तासासाठी 18 हजार, तिकीट असल्यास 21 हजार 600, इतर संस्थांसाठी 13 हजार 500, तिकीट असल्यास 14 हजार 850 रुपये भाडे असणार आहे. तर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि गदिमा नाट्यगृहासाठी मोफत असलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी सहा हजार, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी आठ हजार, शाळांच्या तीन तासाकरिता 12 हजार 500, तिकीट असल्यास 15 हजार, महाविद्यालयांसाठी पाच तासाकरिता 20 हजार, तिकीट असल्यास 24 हजार आणि इतर संस्थांसाठी 15 हजार, तिकीट असल्यास 16 हजार 500 रुपये दर असणार आहेत. पाचही नाट्यगृहात रंगीत तालीम, सरावासाठी दर कमी असणार आहेत.