पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये फ्रंट लाइन वर्कर्सना करोनाची लस देण्यात येत आहे. त्यानुसार, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय तसेच आरोग्य विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील आज करोनाची लस घेतली.
शहरामध्ये 16 जानेवारीपासून करोनाचे लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. मंगळवारी पोलिसांनाही लस देण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी सकाळी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही लस घेतली.
करोना अजून आपल्या मधून गेलेला नाही. सुरूवातीला जे फ्रंटलाइन वर्कर्स काम करत आहेत, त्यांना लस देण्यात येत आहे. ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी करोनाची लस वेळेत घ्यावी. तसेच नागरिकांनीही करोनाच्या नियमांचे पालन करावे. बाहेर फिरत असताना मास्क वापरावा, सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.