पिंपरी – बीआरटी कॉरिडॉरमध्ये सुसाट धावणाऱ्या बसचे नॉन बीआरटी दरवाजे उघडे ठेवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. शहरातील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी वेगवान वाहतुकीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गांवर बीआरटी कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत. यामधून गर्दीच्या वेळीदेखील पीएमपी बस वेगाने ये-जा करत आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
या कॉरिडॉरमधील बीआरटी बस थांब्यात प्रवाशांना चढता-उतरता यावे, याकरिता बसच्या उजव्या बाजूला दोन दरवाजे आहेत. तर नॉन बीआरटी डाव्या बाजूला पारंपरिक पद्धतीचे दरवाजे आहेत.
बीआरटी कॉरिडॉरमधून बसचे संचलन सुरू असताना, बीआरटी व नॉन बीआरटी दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बीआरटी कॉरिडॉरमध्ये बस संचलानदरम्यान चालकांकडून बीआरटी दरवाजे बंद केले जातात. तर डाव्या बाजूचे दरवाजे सर्रासपणे उघडे ठेवले जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
याशिवाय रस्ते अपघाताचा धोका पत्करून, बसथांबा वगळून भररस्त्यात पीएमपी सेवकांना बसमध्ये प्रवेश देण्याचे उद्योग चालकांकडून सुरू असल्याने, या दोन्ही ठिकाणच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे अपघाताच धोका संभवतो.