पिंपरी – रावेत येथील मेट्रो इको पार्कमधील झाडे वाचविण्यासाठी रावेत मेट्रो इको पार्क बचाव समिती आणि पर्यावरणप्रेमींच्या वतीने मंगळवारपासून (दि. २३) साखळी उपोषण सुरू केले आहे.
शुक्रवारी (दि. २६) सकाळी मानवी साखळी करून मेट्रो पार्कमधील पाण्याअभावी जळालेल्या १४० झाडांस जबाबदार असेलल्यांचा निषेध नोंदविण्यात आला. रावेत मेट्रो इको पार्कमधील झाडे पाणी न मिळाल्याने १४० झाडे मृत झाल्याचा अहवाल महापालिकेच्या उद्यान विभागाने पर्यावरणप्रेमींच्या मागणीनुसार त्यांना दिला आहे. ही झाडे जगावीत यासाठी पर्यावरणप्रेमी मंगळवारपासून रावेत मेट्रो इको पार्कच्या मुख्य द्वाराजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपोषण सुरु केले आहे.
झाडे जगवा, झाडे वाचवा या हेतूने हे आंदोलन सुरू असून, गेल्या ४ महिन्यामंध्ये १००० पैकी १४० झाडे पाणी आणि देखभालअभावी जळाली आहेत. त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व वयोगटातील पुरुष एकत्र येत सकाळी शांततेच्या मार्गाने मानवी साखळी करून निषेध नोंदविला. मेट्रो इको पार्क बचाव समितीतर्फे जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबंधित सर्वांना अनेक निवेदने दिलेली आहेत. परंतु, प्रशासन मेट्रो इको पार्क उघडून द्यायला तयार नाही. प्रशासनाचा निषेध म्हणून २३ जानेवारीपासून मेट्रो इको पार्क बचाव समितीतर्फे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. तर, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रशासनाचा निषेध करण्याकरता मेट्रो इको पार्क बचाव समितीतर्फे मानवी साखळीचे आयोजन केले होते. त्यात मेट्रो इको पार्क समितीचे प्रशांत राऊळ, विकास बडोलिया, ऍड. ज्ञानेश्वर चव्हाण, संजित सुखटणकर, अमोल शिंदे, संपतराव शिंदे, ब्रम्हानंद घुगरे आदीसह अडीचशे रहिवाशांनी सहभाग घेतला.
रावेत मेट्रो इको पार्क
रावेत येथील मेट्रो इको पार्क हे २०१७ मध्ये महामेट्रोने मेट्रोच्या कामादरम्यान तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून मेट्रो इको पार्कची निर्मिती केली. २५० प्रजातींची दुर्मिळ 1000-1500 झाडे ही या मेट्रो इको पार्कमध्ये लावलेली आहेत. तसेच पार्कमधील बरीचशी झाडे ही येथील स्थानिक रहिवाशांनीही लावलेली व 2023 पर्यंत या झाडांची काळजी घेतली आहे. 2022-23 मध्ये मेट्रो इको पार्कची जागा भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या गोदामा करता दिले व बांधकामही सुरू केले. हे बांधकाम अवैध असून, यासंदर्भात महापालिकेने त्यांना नोटीसही बजावली आहे. तरीही तेथे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या दरम्यान काही झाडांचीही अवैधपणे तोडणी केलेली आहे. तसेच महापालिकेने डिसेंबर 2023 मध्ये पंचनामा केला तेव्हा 140 प्रकारची दुर्मिळ झाडे मृत पावली आहेत, असा अहवाल दिला. तर, मेट्रो इको पार्कला सप्टेंबर 2023 पासून सील केले आहे.