पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पालकमंत्री पाटील यांनी भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना या वेळी पाटील यांनी डॉक्टरांना केल्या.
आयुकाची दुर्बीण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी (दि. 27) अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले. पाच विद्यार्थिनी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत, असे त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत नेलेले चॉकलेट दिले. हे पाहून विद्यार्थीनींनी स्मित हास्य देत पालकमंत्र्यांनी थॅंक यू म्हटले. यामुळे तणावातील वातावरणात काहीसे निवळले. पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका, अशा शब्दांत धीर दिला. साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास कांबळे, गणेश भेगडे, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे उपस्थित होते.