पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्र्शासनाकडून पूर्वतयारी सुरु करण्यात आली. जिल्ह्यात 8 हजार 213 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा प्र्शासनाकडे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी नव्याने 1 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. सुमारे दिड हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र याप्र्माणे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.
पुणे जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. मागील लोकसभेला जिल्ह्यात ८ हजार १७५ मतदान केंद्रे होती, त्यामध्ये यंदा ३८ ने वाढ होऊन ८२१३ मतदान केंद्रे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात निश्चित करण्यात आली होती. मात्र, शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी, नाव वगळणी आणि पत्त्यातील दुरुस्ती याबाबतचे तब्बल दोन लाख तीन हजार ११९ अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक लाख चार हजार ४६४ अर्ज हे केवळ मतदार नोंदणीचे आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात आणखी वाढ होणार जिल्हा प्र्शासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अंतिम मतदारयादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अंतिम यादीत नावे असलेल्या मतदारांनाच लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर असणार आहेत. तसेच जुन्या इमारती, अपुरी जागा, मतदान केंद्रांकडे जाण्यास प्रशस्त वाट नसणे अशा विविध कारणास्तव ६२५ इमारतींमधील मतदान केंद्रे किंवा खोल्या बदलण्यात आल्या आहेत. एका मतदान खोलीवर १५०० मतदार मतदान करू शकणार आहेत, त्यापुढील मतदारांना त्याच मतदान केंद्रावर दूसऱ्या खोलीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे एकाच मतदान खोलीवर मतदारांची गर्दी, रांगा लागणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्र्शासनाकडून सांगण्यात आले.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र
जुन्नर ३५६, आंबेगाव ३३८, खेड ३८५, शिरूर ४०५, दौंड ३०९, इंदापूर ३२९, बारामती ३७६, पुरंदर ४१०, भोर ५६१, मावऴ मुळशी ३८१, चिंचवड ५२८, पिंपरी ३९९, भोसरी ४६४, वडगाव शेरी ४५२, खडकवासला ४६५, शिवाजीनगर २८०, कोथरूड ३९८, पर्वती ३४४, कसबा २७०, हडपसर ४९४ आणि पुणे कॅन्टोन्मेंट २७४