पुणे – अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने हजारो पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले. भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह प्रवीण दबडघाव, पुरातत्व आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, कीर्तनकार चारुदत्त आफळे, अभिनेता राहुल सोलापूरकर, सुहास क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा तीन संकल्पांसाठी तीन वेळा पठण करण्यात आले. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्यांनी रामरक्षा पठणाचे नेतृत्व केले. यामध्ये मा. स. गोळवलकर विद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले. आशिष केसकर यांचे संगीत आणि चारुदत्त आफळे यांनी गायन केले. अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी रामजन्मभूमीचा इतिहास सांगितला. तर, मंदिर बांधणे सोपे आहे; परंतु त्याची सुरक्षा करणेही तितकेच महत्त्वाचे असून, काही वाईट शक्तींपासून आपल्याला यापुढे त्याचे संरक्षण करायचे आहे, असे मत आफळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक होण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या उपक्रमातून आपणा सर्वांना मोठी ऊर्जा मिळाली असून या ऊर्जेचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो असे रासने म्हणाले.
“अयोध्येत उभारण्यात आलेले राम मंदिर हे नागर शैलीचे आहे. या पद्धतीत गाभाऱ्यावर शिखर येते त्यावर कलश असतो. गाभारा, शिखर यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे मंदिर शास्त्रीयदृष्ट्या योग्यच आहे.” – डॉ. गो. बं. देगलूरकर, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक