दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा : 2986 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण
पिंपरी – आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. शासनाच्या वतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. पिंपरी-चिंचवड विभागातून 3786 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश 2986 जागांवर प्रवेश झाले आहेत. तर तब्बल 800 जागा रिक्त आहेत. अद्याप दुसरी फेरी सुरू झाली नसल्याने शहरातील पालकांना दुसऱ्या फेरीची प्रतिक्षा आहे.
आरटीई प्रवेशपात्र असलेल्या 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड विभागामध्ये 179 शाळा पात्र आहेत. त्यामध्ये 3786 जागांची क्षमता आहे. पहिल्या फेरीमध्ये 3786 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. त्यामधील 2986 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या फेरीसाठी कागदपत्रांची पूर्तता करत प्रवेश निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर या मुदतीमध्ये फक्त 2013 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुन्हा पंधऱा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली. पिंपरी विभाग व आकुर्डी विभाग मिळून 2986 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अद्याप 800 जागा रिक्त आहेत. मात्र त्यासाठी दुसरी फेरी अद्याप सुरू झालेली नाही.
सहा पालकांची तक्रार
शहरातील सहा विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाबाबत जिल्हा परिषदेमध्ये तक्रार केली होती. त्यांचे कागदपत्र पूर्ण असूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. जिल्हा परिषदेमध्ये अपील केल्यानंतर त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये विद्यार्थ्यांचे कागदपत्र योग्य असून ते ग्राह्य धरण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला देण्यात आली. त्याच सहा विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
पहिली फेरी सुमारे दीड महिना सुरू होती. यामध्ये 2986 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होते. अद्याप दुसरी फेरी सुरू झाली नाही. दिवाळीनंतर दुसरी फेरी सुरू होईल. त्यानंतर रिक्त जागा भरण्यात येतील.
– पराग मुंढे, प्रशासन अधिकारी, माध्यमिक विभाग
एकूण पात्र शाळा – 179
प्रवेशाची क्षमता – 3786
प्रवेश पूर्ण – 2986
रिक्त जागा – 800