पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असून त्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) व बक्षीस रक्कम दिवाळीपूर्वीच अदा करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी सानुग्रह अनुदान (बोनस) व बक्षीस रक्कम दिली जाते. त्याप्रमाणे यावर्षी देखील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाच्या बुधवारच्या (दि. 11) ठरावाच्या मान्यतेने मूळ वेतन, महागाई भत्ता यावर 8.33 टक्के प्रमाणे सानुग्रह अनुदान व 21 हजार रुपये इतकी बक्षीस रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे.
सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करणेत येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षीस रक्कम जाहीर झाल्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी “प्रवासी दिन’, “प्रवासी मित्र’, “डेपोनिहाय पालक अधिकारी’ असे उपक्रम राबविले आहेत. पीएमपी कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.