Suresh Gopi | Resignation | केरळ या राज्यात प्रथमच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खाते उघडले. अभिनेते सुरेश गोपी भाजपच्या तिकिटावर येथून विजयी झाले. रविवारी त्यांनी राज्य मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शपथही घेतली.
दरम्यान, गोपी यांना मंत्री पदाची जबाबदारी नको आहे. त्यांना लवकरच पदमुक्त केले जाईल येथपासून तर राज्यमंत्रिपद मिळाले म्हणून ते नाराज असल्याच्या बातम्या आज सकाळपासून सुरू होत्या. तथापि, त्या अफवा असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
स्वत: सुरेश गोपी यांनी याचा इन्कार केला आहे. सोशल मीडियावरिल आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘मी राजीनामा देणार असल्याच्या खोट्या बातम्या काही प्रसारमाध्यमांकडून पसरवल्या जात आहेत. हे पूर्णत: चुकीचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या संपूर्ण विकासासाठी कटीबध्द आहोत’ असे गोपी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केरळ भाजपमध्ये आता मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याच्याही बातम्या होत्या. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन भडकले आहेत. असे काही होणार नसल्याचे जाहीर करतानाच सुरेश गोपी यांच्या संदर्भातील बातमीही अफवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
केरळमधील पत्रकारांचा एक गट भाजपच्या विरोधात बातम्या पेरण्यात गुंतला आहे. निवडून आलेले खासदार आणि आता मंत्री असणारे सुरेश गोपी यांना त्रिशूर येथून पराभूत करण्याची योजना भाजपने तयार केली असल्याचाही दावा काही बातम्यांमध्ये करण्यात आला असून हा प्रकार हास्यास्पद असल्याचे सुरेंद्रन यांनी म्हटले आहे.