पिंपरी – महापालिकेच्या कासारवाडीतील जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलेल्या 19 जणांपैकी 18 जणांना बुधवारी (दि.11) डिस्चार्ज दिला आहे. दहा वर्षाच्या मुलीवर खासगी रूग्णालयात अद्याप उपचार सुरू असल्याचे वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाच्या पाण्याला शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन वायुच्या सिलेंडरला गंज चढला होता. त्यामुळे सिलेंडर जीर्ण झाल्याने एक छोटे छिद्र पडून त्यातून मंगळवारी गॅसची गळती झाली. त्यामुळे पोहण्यसाठी आलेल्यांसह तलावावर उपस्थित असलेले जीवरक्षक, सुरक्षा रक्षकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
यामधील 16 जण वायसीएम रूग्णालयात, एका 10 वर्षांच्या मुलीसह तिघांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यामधील 18 जणांना बुधवारी (दि.11) डिस्चार्ज झाला असून दहा वर्षांच्या मुलीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, तिची प्रकृती सध्या स्थिर असून आज (गुरूवारी) तिलाही रूग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे डॉ. वाबळे यांनी सांगितले.