नेवासा -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुंड व्यक्तीविरुद्ध चौकशी होऊन कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज (बुधवार) सकाळी 11 वाजता मुकिंदपूर (नेवासा फाटा) परिसरातील व्यापारी व ग्रामस्थांनी एकत्र येत नेवासा पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, नेवासा फाटा येथील बादल कैलास परदेशी हा स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी अतिक्रमण केलेल्या जागेत प्रिन्स दरबार नावाचे हॉटेल चालवत असून, या हॉटेलमधून अवैधरीत्या गावठी व देशी दारूची विक्री करीत आहे. त्याच्या राहत्या घरी प्रभाग दोन शिवाजीनगरमध्येही अवैधरीत्या दारूविक्री करीत असून, त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात 18 ते 20 गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने स्वत: अतिक्रमण केलेल्या जागेवरून झालेल्या वादास जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असून, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मोडतोड करून विटंबना केलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ परदेशी याने स्वतः सोशल मीडियावर प्रसारित करून ही घटना गणेश माटे व बाबा पठाण यांनी केल्याची खोटी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केलेला आहे.
या घटनेची नेवासा पोलिसांनी सखोल चौकशी करून समाजात जातीय तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी सरपंच सतीश निपुंगे, मेडिकल असोशिएशनचे रमेश सावंत, संजय लिपाने, विनायक शिरसाठ, मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे, विपुल पटेल, अंजूम पटेल, दीपक डमाळे, सुनील सवई, भाऊसाहेब भुमकर, राजू बोलके, बाळासाहेब देवखिळे, प्रसाद खंडागळे आदींसह व्यापारी उपस्थित होते.