पिंपरी – चिखली पूर्णानगर येथील हार्डवेअर ऍण्ड इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानाच्या वरच्या माळ्यावर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कशी घडली? याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने चौकशी समितीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी बुधवारी (दि.30) दिली.
चिमणाराव चौधरी यांचे पूर्णानगर येथील टेल्को रोडला भाड्याच्या गाळ्यात सचिन हार्डवेअर ऍण्ड इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. चौधरी कुटुंबीय दुकानाच्या पोटमाळ्यावर वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे दुकानात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. रंगाचे डबे, थिनर असल्याने तातडीने पेट घेतला. आग भडकली. हवा येणे बंद झाले. त्यामुळे गुदमरल्याने आणि होरपळून चौघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, माजी नगरसेवक एकनाथ पवार यांच्यासह आदींनी भेट दिली.
अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीमध्ये पोलीस, अग्निशमन विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल सादर करेल. त्याचबरोबर शहर परिसरात आणखी दुकानाच्या वरच्या माळ्यावर कोण वास्तव्य करत आहे का, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येईल.
आग लागताच वीजपुरवठा खंडित
सचिन हार्डवेअर ऍण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच महावितरणकडून पहाटे 6 च्या सुमारास इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यात महावितरणकडून दुकानात लावलेल्या मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे तसेच वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. सोबतच महावितरणच्या यंत्रणेमधून कोणत्याही प्रकारचे शॉर्टसर्किट झाले नसल्याचे या प्राथमिक पाहणीत आढळून आले. दुकानातील आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त होत असल्याने राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती महावितरणने दिली आहे.