हिंजवडी, दि. 24 (वार्ताहर) – जिल्ह्यातील 1385 पैकी 810 ग्रामपंचायतींमध्ये “स्वच्छता हीच सेवा’ अभियान पंधरवडा साजरा होत आहे. त्यापैकी 465 ग्रामपंचातींनी हे अभियान पूर्णत्वास नेले. स्वच्छता अभियानात मारुंजी-नेरे ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे काम वाखण्याजोगे आहे. स्वच्छता दूत निर्माण करणाऱ्या या उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशासनाने नोंद घेतली असून, शासकीय पोर्टलवर आशा विधायक उपक्रमांची माहिती प्रसारित केली जाणार असल्याचे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोनपे यांनी शनिवारी (दि.24) मारुंजीत काढले.
मारुंजी-नेरे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सहकार्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच हिंजवडी पोलिसांच्या सहकार्याने “माझा गाव, माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत “स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना टोनपे बोलत होते. या वेळी स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी सुमारे एक किलोमीटरची मानवी साखळी करून स्वच्छता संदेश व जनजागृती करण्यात आली. येथील आलार्ड कॉलेजपासून तिरंगा फडकावून अभियानाला सुरुवात झाली.
या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे, मारुंजीचे सरपंच आकाश बुचडे, नेरे गावच्या सरपंच कविता जाधव, दीपाली जाधव, सचिन जाधव, बाबाजी शेळके, समीर बुचडे, कृष्णा बुचडे, राहुल जांभूळकर, राहुल जाधव, सोमनाथ वाघोले, विकास जाधव, पै. रवींद्र सोरटे, लालचंद काटे, ग्रामविकास अधिकारी सोमा खैरे, डी. बी. नलावडे उपस्थित होते. पदयात्रेत हातात स्वच्छतेचा संदेश देणारे पोस्टर आणि तिरंगा ध्वज घेवून विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, सदस्य प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे रस्ते तिरंगामय झाल्याने सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण झाली.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि युवा कीर्तनकार हभप संग्राम महाराज भंडारे यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या वेळी स्वच्छतेच्या मारुंजी-नेरे पॅटर्नद्वारे सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने नैराश्येच्या गर्तेत जाऊन, परिवर्तन घडून पुन्हा स्वच्छता अभियानात मोठ्या हिमतीने सामील होणाऱ्या अंगद भुसारे व ओंकार भुसारे या पिता पुत्रांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळा मारुंजी, तुकाई माध्यमिक विद्यालय नेरे, पुम्बाज पोलीस भरती ऍकॅडमी, अलार्ड ज्युनियर कॉलेज, आयआयएमएस कॉलेजचे विद्यार्थी व लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधील नागरिक तसेच लोकमित्र ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.
काय आहे नेरे मारुंजी स्वच्छता पॅटर्न
नेरे, मारुंजी मुख्य रस्त्यांवर सोसायटीमध्ये राहणारा नोकरदार वर्ग रात्री अपरात्री कचरा आणून टाकत होता. त्यांच्यावर वॉच ठेवून प्रसंगी त्यांचा पाठलाग करून त्यांना उठाबशा काढायला लावल्या जात असून ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच प्रसारित झाल्याने हा पटर्न चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे या पटर्नला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला.